लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : लघु व्यवसायासाठी कर्ज मिळावे यासाठी आठ महिन्यांपूर्वी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही कर्ज मिळत नसल्याने हताश झालेल्या निरंजन तुकाराम धनद्रवे (५५) रा. किन्हीरोकडे ता. कारंजा यांनी भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.धनद्रवे यांचे कारंजात इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स दुरूस्तीचे दुकान असून त्यांनी ८ महिन्यांपूर्वी कर्ज मंजूर करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या कारंजा शाखेत अर्ज केला होता. परंतु ८ महिने उलटूनही शाखा व्यवस्थापकाने कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ केल्याने निराश होऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उपचारावेळी धनद्रवे यांनी सांगितले. संबंधित व्यक्तीचे कर्जप्रकरण हे बुलडाणा येथून मंजूर होऊन येत असल्याने कर्जप्रकरण मंजूर करण्यास विलंब लागल्याचे शाखा व्यवस्थापकाने सांगितले. घटनेनंतर धनद्रवे यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर त्यांचेवर उपचार सुरू होते. या प्रकरणी कारंजा पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आठ महिन्यांपूर्वी कर्ज प्रकरणे वाशिम येथून मंजूर होत होती. कर्ज प्रकरणाची प्रक्रिया बदलल्याने आता कर्ज प्रकरणे बुलडाणा येथून मंजूर होत आहेत. संबंधित इसमाच्या कर्ज प्रकरणातील कागदपत्रात त्रूटी आहेत.- शहबाज शेख, शाखा व्यवस्थापक,भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा