गेल्या चार दशकांपूर्वी प्रत्येक गावात गावठाण क्षेत्र, ई-क्लास जमिनीवर उंचच्या उंच हिरवेगार गवत वाढलेले दिसायचे. त्या काळी शेतात ज्वारी, बाजरी, मका, अशी तृणधान्यांची पिकेही दिसायची. कालांतराने वाढत्या लोकसंख्येमुळे गावठाणावर अतिक्रमणे वाढू लागली. त्यात ई-क्लाससह वनविभागाच्या हद्दीतही अतिक्रमण झाले. परिणामी गुरांचा चारा नष्ट झाला, ई-क्लासचे क्षेत्र घटले, तर वन्यप्राण्यांच्या अधिवासातील अतिक्रमणामुळे ते प्राणी शिवारात धाव घेऊ लागले. हे प्राणी ज्वारी, मका, बाजरी या तृणपिकांसह उडीद, मूग ही कुटार देणारी पिके नष्ट करू लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ केली. त्यामुळे शेतातील चारापिकांसह कुरण क्षेत्रही दिसेनासे झाले. आता समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत कुरण क्षेत्र विकास हा विषयच ठेवण्यात आला असून, या स्पर्धेत सहभागी ४३ गावांतील हजारे हेक्टर क्षेत्रावर पुन्हा हिरवेगार लुसलुशीत गवत बहरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
०००००००००
सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्षलागवड
समृद्ध गाव स्पर्धेेत पानी फाउंडेशनने कुरण क्षेत्र विकास विषय घेतल्याने स्पर्धेत सहभागी गावात गावठाण, ई-क्लासवर चराईबंदी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा या जमिनीवर हिरवेगार गवत वाढले असून, या जागेत अतिक्रमण होऊ नये यासाठी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून या जागेवर वृक्षलागवडही करण्यात आली आहे.