लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदा अनुकूल वातावरणामुळे दमदार उत्पादन झालेल्या झेंडुच्या झाडांचे व फुलांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या दिवशी झेंडू फुलाला मातीमोल दर मिळाला. सडलेली फुले शेतकऱ्यांनी चक्क रस्त्यावर फेकून दिली.पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीनही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात पारंपरिक पिके घेतली जातात. त्यापासून फारसे उत्पादन मिळत नाही; शिवाय दरवर्षीच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही प्रयोगशिल शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत शेवंती, झेंडू यासारख्या फुलझाडांची लागवड करून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणापुढे ही पिकेही आता तग धरत नसल्याचे दिसून येत आहे. वाशिमसह अकोला आणि बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये गत सात ते आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सातत्याने पाऊस होत आहे. त्याचा जबर फटका झेंडूच्या झाडांना बसला असून ओल्या झालेल्या फुलांना भर दिवाळीच्या दिवशी जेमतेम ८ ते १० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. याच दिवशी सायंकाळच्या सुमारास तर २० किलो झेंडूच्या फुलांचे पोते ३० ते ४० रुपयांचा विकल्या गेले. शेवटच्या टप्प्यात राहिलेली फुले शेतकरी व व्यावसायिकांनी तशीच रस्त्यावर सोडून दिली.दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या झेंडू फुलझाडांना पावसाचा जबर तडाखा बसून संपूर्ण क्षेत्र नेस्तनाबूत झाले. या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले असून प्रशासनाने सर्वे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.
पावसामुळे झेंडू उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 10:58 AM