जऊळका रेल्वे : परिसरात सोमवार, ८ मे ला रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसामुळे झाडे, विद्यूत खांब आणि वाहिन्या उन्मळून पडण्यासोबतच अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून गेली. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले आहे.जऊळका रेल्वे येथे सोमवारी रात्री विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटून पाऊस झाला. यादरम्यान अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून गेली; तर काही नागरिकांच्या घराच्या भिंती जमिनदोस्त झाल्या. विद्युत लाईनचे तारासहीत पोल कोलमडून पडले असून यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने जऊळका-अमनवाडी हा रस्ता बंद झाला. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरांमधील धान्य पावसामुळे भिजले आहे. परिसरात आजही (९ मे) ढगाळी वातावरण कायम असून विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.
वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळित!
By admin | Published: May 10, 2017 7:07 AM