यशवंत हिवराळे - राजुरामालेगाव तालुक्यातील टँकरग्रस्त गाव म्हणून शासनदरबारी नोंद असलेल्या राजूरा येथे सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनातर्फे मार्च महिना उजाडण्यापूर्वीच टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी टँकरचा थांगपत्ता नाही. तीन हजारावर लोकसंख्या असलेल्या राजुरा येथील ग्रामस्थांची तहान भागविणारे सार्वजनिक व खासगी पाणवठे व कूपनलिकांनी उन्हाळयाची चाहूल लागण्यापुर्वीच दम तोडला. त्यामुळे ग्रामस्थांना मिळेल त्या ठिकाणावरुन पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. अलीकडच्या दशकभरात राजूरा ग्रामस्थांना भीषण पााण्ीटंचाईचे चटक सोसावे लागत आहे. ‘राजुरा आणि उन्हाळयात टँकर’ हे जणू येथील समिकरणच बनले आहे.पाणीटंचाईची एवढी गंभीर समस्या असताना मात्र गाव परिसरात जलपुनर्भरणच्या कोणत्याच ठोस उपाययोजना राबविल्या जात नाहीत. परिसरात छोटे-मोठे तलाव होण्यास पुरेसा वाव आहे; मात्र राजकीय सारीपाटावरील घुरघोडी व श्रेयाचा वाद तथा प्रशासकीय अधिाकऱ्यांचे उदासीन धोरणामुळे गाव परिसरात एकही तलाव अथवा बंधारा होउ शकला नाही. जलसंपदा विभागाचे वतीने परिसरात अनेकदा सर्वेक्षण झाले. मात्र ते सर्वेक्षण कागदापलीकडे सरकू शकले नाही. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे. जलसंधारणाची कोणतीच कामे नसल्याने येथील पाणीपातळी मोठया प्रमाणावर खालावली आहे. पाचशे फुटाचे कूपनलिकेतून पाण्याचा थेंबही वर येत नसल्याचे अनेक उदाहरणे आहेत. काहींनी तर केवळ घरापुरते पाणी मिळावे म्हणून दोन ते तीन कूपनलिका घेतल्या. मात्र जमिनीतून केवळ धुराळाच बाहेर आल्याची वस्तुस्थिती आहे. पाणीटंचाईची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या तसेच सद्यस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.