शिरपूर जैन (वाशिम)- वर्धा ते औरंगाबाद नेण्यात आलेल्या विद्युत वाहिनीचे, पावर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे शिरपूर परिसरात उभारण्यात आलेले पाच टॉवर वादळवा-यामुळे जमीनदोस्त झाले. शनिवारी सकाळी (9 जून) ही घटना उघडकीस आली. सदर टॉवर महावितरणच्या विद्युत वाहिनीवरही पडल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
वर्धा येथून औरंगाबादकडे वीज नेण्यात येत असून, यासाठी पावर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे वीज वाहिनीचे तार व टॉवर उभारणीचे काम केले जात आहे. शिरपूर परिसरातून वीज वाहिनी गेली असून, अनेकठिकाणी टॉवर उभारणी करण्यात आली. अद्यापही या वाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने वीजपुरवठा सुरू झालेला नाही. दरम्यान, ८ जूनच्या रात्रीच्या सुमारास वादळवा-यामुळे शिरपूर परिसरातील पाच टॉवर जमीनदोस्त झाले. दरम्यान टावर महावितरणच्या वीज वाहिनीवर पडल्याने महावितरणचे जवळपास २५ ते ३० विद्युत खांबही जमीनदोस्त झाले. यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला.