वाशिम: जिल्ह्यात पावसाचे तांडव सुरूच आहे. चालू आठवड्यात दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मंगळवारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत तास दोन तास पाऊस धो-धो कोसळत राहिला. या पावसामुळे शेकडो एकरातील सोयाबीनच्या पिकाला फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावल्याने शेतकरी रडकुंडीस येत असल्याचे दिसते. जिल्ह्यात जुलैपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिके होत्याची नव्हती झाली आहेत. जुलै ते सप्टेंबरदरम्यान वारंवार अतिवृष्टी झाल्याने पिकांना फटका बसला. त्यातून वाचलेले सोयाबीनचे पीक काढण्याच्या तयारीत शेतकरी असतानाच ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा धडाका लावला. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन नेस्तनाबूद झाले.
मागील दोन दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या कापणी आणि काढणीचा वेग वाढवला. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुड्या लावून ठेवल्या, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापणी केलेले सोयाबीन पडून होते. अशात मंगळवारी सकाळी १० वाजतापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. यात कापणी करून ठेवलेले शेकडो एकरातील सोयाबीन पाण्यात भिजले. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने आता या सोयाबीनमधून कोणतेही उत्पादन होण्याची शक्यताही उरली नसल्याने शेतकरी रडकुंडीस आले आहेत. कापणी, काढणी करणाऱ्यांची तारांबळमंगळवारी शेतकऱ्यांनी शेतात कापणी करून लावलेल्या सुड्यातील सोयाबीनची मळणी यंत्रणातून काढणी सुरू केली होती, तर अनेक शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करून कापणी सुरू केली होती; परंतु पावसाने सकाळीच हजेरी लावल्याने कापणी आणि काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात सोयाबीन पाण्यात भिजलेच शिवाय मजुरांची मजुरीही अंगावर आल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले.