मंगरुळपीर - तालुक्यात २१ जुलैचे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी,नाल्यांना पूर आला .यामुळे शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीचा फटका बसल्याने तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे मोठे सावट ओढावल्याने बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. २१ जुलैचे रात्री झालेल्या पावसाची ६२ मिमी. नोंद झाली आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. तालुक्यात आसेगाव, चिखलागड, सावरगाव यासह गणेशपूर आदी भागातील नदी,नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान झाले. तर शेतजमीन खरडून गेली. आधीच विविध कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून खरीप हंगामातील पेरणी केली होती. नुकतेच पिके वर आली असताना मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.