वाशिम, दि. १२- जिल्ह्यात मंगळवारपासून दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप देण्याला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शिरपूरसह काही ग्रामीण भागात तर दुसर्या दिवशी अर्थात बुधवारी कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड शहरात दुर्गादेवीला ढोल ताशाच्या गजरात उत्साहात निरोप देण्यात आला. यावर्षी जिल्ह्यात ४८३ ठिकाणी दुर्गा देवीची मनोभावे स्थापना करण्यात आली होती. त्यात वाशिम शहर ४६ आणि ग्रामीण भागात २६, रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत ५२, मालेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत ५१, शिरपूर येथे ३६, मंगरुळपीर तालुक्यात ४८, अनसिंग येथे १४, आसेगाव २१, कारंजा शहरात ३५; तर कारंजा ग्रामीणमध्ये ५४,मानोरा येथे ४५ आणि धनज येथे ३१ दूर्गोत्सव मंडळांचा समावेश होता. दुर्गा विसर्जन शांततेत होण्याच्या दृष्टिकोनातून विसर्जनाचे तीन टप्पे पाडण्यात आले. पहिल्या टप्प्यात दसर्या दिवशी शिरपूर पोलीस स्टेशनांतर्गतच्या गावांमध्ये दुर्गामातेला भावपूर्ण निरोप देण्यात आला. दुसर्या टप्प्यात कारंजा, मंगरुळपीर, रिसोड व मालेगाव शहरात भाविकांनी दुर्गामातेला भावपूर्ण निरोप दिला. सार्वजनिक दुर्गादेवी मंडळांनी होम करून दुर्गादेवीची विधिवत पुजा केली. दहा दिवसात मंडळांसमोर दांडिया तसेच इतर धार्मिक कार्यक्रम व समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पाडले. दरम्यान, मंगळवारपासून दुर्गादेवी मंडळांनी विसर्जनला सुरूवात केली. विविध दुर्गामंडळांनी डीजे, ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत मिरवणुकीत सहभाग घेतला. यामध्ये तरूणांचा मोठा सहभाग होता. तर महिलांनीही आपापल्या दुर्गादेवी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.विसर्जनासाठी तलावात येणार्या मंडळासाठी नगर पालिका तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. मोठय़ा मुर्तींंसाठी क्रेनचीही व्यवस्था केली होती. पाण्यात खोलवर जाऊ नये म्हणून वारंवार सूचना देण्यात येत होत्या. काही मंडळांनी दुर्गादेवीसमोर केलेले देखावे लक्षवेधक ठरले. गुरूवारी वाशिम व मानोरा येथे दुर्गादेवीचे विसर्जन होणार आहे.
दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप!
By admin | Published: October 13, 2016 1:56 AM