वाशिम -महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा या उपक्रमात २ ऑक्टोबरपर्यंत वाशिम जिल्ह्यात महावितरणकडून १ हजार ६८१ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. शिवाय प्रलंबित असलेल्या १३३ घरगुती वीज ग्राहकांच्या नावातही बदल करण्यात आला आहे. यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा' उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या सेवा पंधरवाड्यात विविध विभागातील १४ सेवांबाबत असलेल्या प्रलंबित अर्जाचा जलदगतीने निपटारा करण्याचे उध्दिष्ट ठेवण्यात आले होते. या सेवा मध्ये प्रलंबित घरगुती वीज जोडणी आणि मालमत्ता हस्तांतराणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव जोडणे या महावितरणच्या दोन सेवांचा समावेश होता.
महावितरण अकोला परिमंडळाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात वाशिम जिल्ह्यातील १ हजार ६८१ प्रलंबित नविन वीज जोडण्या देण्यात आल्या, तसेच १३३ ग्राहकांच्या नावातही बदल करण्यात आला आहे. महावितरणचे जनसंपर्क अधिकारी पी. एम. राठोड यांनी ही माहिती दिली आहे.
अकोला परिमंडळात ६,१७७ नविन घरगुती वीज जोडण्या -महावितरणने वाशिम जिल्ह्यासह अकोला परिमंडळात प्रलंबित असलेल्या एकून ६ हजार १७७ नविन घरगुती ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात १ हजार ८९७, तर बुलढाणा जिल्ह्यातील २ हजार ५९९ प्रलंबित नविन वीज जोडण्याचा समावेश आहे. याशिवाय ६४२ ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आला आहे.यामध्ये अकोला जिल्ह्यातील २८८, तर बुलढाणा जिल्ह्यातील २२१, ग्राहकांचा समावेश आहे..
नव्या जोडणीसाठी ४०६ वीजग्राहकांना कोटेशन -सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत महावितरणने अकोला परिमंडळातील तीन जिल्ह्यात ६, १७७ प्रलंबित घरगुती वीज ग्राहकांना नविन वीज जोडण्या दिल्या. याशिवाय परिमंडळातील ४०६ ग्राहकांच्या वीज जोडणीच्या नविन अर्जावर कार्यवाही करत त्यांना पैसे भरण्याबाबत कोटेशन देण्यात आलेले आहेत. या ग्राहकांनी पैसे भरल्यानंतर त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे.