स्टोन क्रशरच्या अहोरात्र निघणाऱ्या प्रचंड धुळीच्या लोटांमुळे आजूबाजूच्या ओलिताची शेती असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचे लेखी निवेदन बोरव्हा या गावातील चार शेतकऱ्यांनी दिले आहे. सोनाबाई नानूसिंग जाधव या विधवा महिला शेतकऱ्यासोबतच नानीकेश विष्णू राठोड व संदीपाल विष्णू राठोड या शेतकऱ्यांची ग. नं. ५१ आणि ५३ मध्ये ओलिताचे शेत असून प्रचंड कष्ट करून आणि महागडे बियाणे वापरून पिके घेणाऱ्या या शेतकऱ्यांच्या शेत शिवाराजवळ स्टोन क्रशर लागल्यापासून धुळीने खरीप व रब्बी हंगामातील पिकांना मागील अनेक वर्षांपासून मुकावे लागत आहे. संबंधित स्टोन क्रशर मालकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे व पीक नुकसानीचे आदेश संबंधितांना देण्यात येण्याची मागणी वारंवार करण्यात आली. अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने मानसिक धक्का बसल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांकडून वारंवार निवेदने देऊनही लक्ष दिले जात नसल्यामुळे पर्यायाने संबंधितांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची व तहसीलदारांना पार्टी करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी लेखी निवेदनात दिलेला आहे.
धुळीमुळे पिके उद्ध्वस्त; नुकसान भरपाई नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:42 AM