राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाशिम-पुसद महामार्गाच्या कामाला जवळपास चार महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या कामामुळे पुढे दळणवळण अधिक सोयीचे होणार असल्याने चालकांसह जनेततूनही समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता या मार्गाच्या कामासाठी पूर्वीचा रस्ता खोदून मुरूम व खडी टाकून दबाई सुरू करण्यात येत आहे. पूर्वी पावसाळाअखेर वातावरणात आर्द्रता असल्याने या मार्गावर चालक, प्रवाशांना फारसा त्रास जाणवला नाही; परंतु आता उन्हाळा सुरू झाला असून, रखरखत्या उन्हामुळे कच्च्या कामातील धूळ मार्गावर उडून वाहनांंच्या खिडक्याद्वारे आत शिरत आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी किंवा खासगी वाहनांतून प्रवास करणारे प्रवासी, तसेच चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे पुढे श्वसनाचे आजार जडण्याची भीती आहे, तसेच धूळ उडाल्यानंतर समोरचे वाहनही दिसत नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडण्याची भीती आहे. त्यामुळे या कामावर पाण्याचा पुरेसा वापर करावा, अशी मागणी प्रवासी आणि चालकवर्गाकडून केली जात आहे.
-----------------------