लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी शहरातील विविध मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचे औचित्य साधून कारंजा शहरातील प्रसिध्द अशा गुरूमंदिरात व दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी ‘दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा’ च्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. तसेच यावेळी भाविकांनी दर्शनाचा, आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव अर्थात दत्तजयंती साजरी करण्यात येते. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी ठिकाणची दत्तमंदिरे प्रसिध्द आहेत. कारंजात दत्ताचा अवतार मानल्या जाणाºया स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांचे प्रशस्त असे मंदिर आहे. या मंदिरात २२ डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त दुपारी ३ ते ६ या वेळेत अविनाश बुवा परळीकर यांची जन्माचे किर्तन त्यानंतर आचार्य पाठक गुरूजी व अरूण शास्त्री खेडकर यांचे अध्याय वाचन तसेच सायंकाळी ७ ते १० या वेळेत मंदिरात श्रींची पालखी, काढण्यात आली. तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहरातील दत्त मंदिरात देखील दत्त जयंती निमित्त दत्त जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी व आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.
दत्त जयंतीनिमित्त गुरुमंदिरात भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 6:25 PM