वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात‘ई-लोकशाही’ कक्ष १ मे पासून कार्यान्वित झाला आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘ई-लोकशाही’ कक्षाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. पालकमंत्री राठोड म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘ई-लोकशाही’ कक्षामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हाटस्अप व ई-मेलद्वारे नागरिकांची तक्रार स्वीकारली जाणार आहे. तक्रार देण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार आहे. तसेच याठिकाणी दाखल झालेल्या तक्रारींचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला जाणार असल्याने या तक्रारी तातडीने निकाली निघण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यावेळी ई-लोकशाही कक्षाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला १०७७ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येईल. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तीला काही कागदपत्रे सादर करावयाची असल्यास व्हाटस्अप अथवा ई-मेलद्वारे सदर कागदपत्रे स्वीकारली जातील. ही तक्रार संबंधित विभागाकडे पाठवून त्याचा नियमित पाठपुरावा करून कमीत कमी कालावधीत तक्रारी निकाली काढल्या जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल होऊन तीन महिने प्रलंबित असलेल्या, त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळालेल्या तक्रारी ‘ई-लोकशाही’ कक्षात स्वीकारल्या जाणार आहेत.