लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील महिलेस तिच्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराची तक्रार करता यावी आणि यासाठी प्रशासकीय कार्यालयात येण्याची गरज तिला भासू नये, या उद्देशाने वाशिम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने ई-लोकशाही दिनाचे दालन खुले करून दिले असून त्यास महिलांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी सोमवारी दिली.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुकास्तरावर; तर तिसºया सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. मात्र, ग्रामीण भागातील महिलांना आपल्या तक्रारी, गाºहाणे लिखीत स्वरूपात मांडण्यासाठी प्रशासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चकरा मारणे परवडत नाही. त्यामुळेच महिला लोकशाही दिनाच्या उपक्रमास पिडित महिलांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील महिलांकरिता ई- लोकशाही दिनाचे दालन खुले करून देत सेतू सुविधा केंद्रांमार्फत महिलांना तक्रारी सादर करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा परिणामकारक फायदा होत असून गेल्या दोन महिन्यात यामाध्यमातून अनेक पिडित महिलांनी प्रशासनाकडे स्वयंस्फूर्तीने तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरणही विनाविलंब केले जात असल्याची माहिती वाशिम येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली.
वाशिममध्ये महिलांसाठी राबविला जातोय ई-लोकशाही दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 5:44 PM