लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी प्रशासनाने जिल्हाबंदी केली आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ई-पास घेऊन संबंधितांना जिल्ह्याबाहेर जावे लागत आहे. ही ई-पास काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागत असून, या आॅनलाईन अर्ज प्र्रक्रियेत गरिबांना त्रास होत आहे, तर सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे.कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रणासाठी शासन, प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तथापि, यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना आणि लॉकडाऊनसह जिल्हाबंदीमुळे अत्यावश्यक सेवेत अडथळा येऊ नये म्हणून शासनाने प्रवासासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही पास काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यात प्रवासाचे कारण आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. प्रामुख्याने आरोग्यविषयक सुविधांसाठीच ई-पासला प्राधान्य असले तरी, अनलॉकच्या काळात इतरही काही अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी ही पास काढता येते. आॅनलाईन अर्जाची पडताळणी करून जिल्हास्तरावरूनच पास मंजूर केली जाते. तथापि, या प्रक्रियेत अनेकांना अडथळे येत आहेत. काही मंडळी सेतू केंद्रांद्वारे अर्ज करीत आहेत; परंतु सेतू केंद्रांकडून यासाठी मनमानी पद्धतीने त्यांच्याकडून शुल्क वसुल केले जात आहे.
आंतर जिल्हा प्रवासासाठी ई-पास दिली जाते. त्यासाठी ंआवश्यक कागदपत्रे जोडून आॅनलाईन अर्ज करावा लागतो. यात कोणाकडून अवाजवी पैसे वसूल केले जात असतील, ते चूक आहे. आमच्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कारवाई करू.-शरद पाटील,अतिरिक्त जिल्हाधिकारी, वाशिम
मी मुलीला सासरी पाठविण्यासाठी ई-पास काढण्याच्या उद्देशाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज केला. नियमानुसार शुल्कही भरले; परंतु आठवडाभर प्रतिक्षा करूनही मला ई-पास मिळाली नाही. काही सेतू केंद्रधारक आॅनलाईन अर्ज करताना मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी करीत असल्याचे त्यानंतर मला कळले.-डॉ. अविनाश मनवर,ग्रामस्थ, इंझोरी