वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही, जिल्ह्यात ई-पॉस मशीनवर अंगठा लावूनच रेशन दुकानांमधून ग्राहकांना धान्याचे वितरण सुरू आहे. यामुळे कोरोना संक्रमनाचा धोका वाढला असून, किमान या काळात तरी आॅफलाईन पद्धतीने किंवा दुकानदारांच्या अंगठ्यावर धान्य वितरण प्रणाली सुरू करण्याची अपक्षा दुकानदारांसह ग्राहकांमधून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर, हात वारंवार धुणे असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे या संकटकाळातही रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीनवर ग्राहकांचा अंगठा लावूनच धान्य वितरण सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ई पास मशीन लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागालाही या नियमाची अंमलबजावणी करावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारावर गेली आहे. रिसोड तालुक्यात एका रेशन दुकानदाराचा कोरोनामुळे १० दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे ई-पॉस मशीन ‘कोरोनावाहक’ ठरण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे. शासनाने आॅफलाईन पद्धतीने धान्य वितरण करावे किंवा ई-पॉस मशीनवर केवळ रेशन दुकानदाराचा अंगठा घेऊन धान्य वितरण करण्याची मुभा दिली तर ई-पास मशिन कोरोनावाहक ठरणार नाहीत, असा सूर दुकानदारांसह ग्राहकांमधून उमटत आहे.ई- पॉस मशिन या कोरोनावाहक ठरू नये म्हणून आॅफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरण करावे किंवा दुकानदाराच्या अंगठ्यावर रेशन धान्य वितरणाला परवानगी मिळावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार झाला तर दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल.-बाळासाहेब खरात स्वस्त धान्य दुकानदार
स्वस्त धान्य घेताना रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशिनवर प्रत्येक ग्राहकांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे एखाद्या संदिग्ध रुग्णांकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे या संकळकाळात तरी आॅफलाईन पद्धतीने रेशन धान्य वितरण व्हावे.- गौतम भगत, लाभार्थी, चिखली ता. रिसोड