वाशिम जिल्ह्यात विविध प्रकारच्या रानभाज्या, रानफळे आढळतात. त्यात तरोटा, फांज, करटुले, तांदूळजा, वाघाटे, शतावरी, मसाला भाजी, चमकुरा, वाल, वावडींग, लाल माठ, हिरवा माठ, चिवळ, कढिपत्ता, कुर्डू, शेवगा शेंग, हादगा फुले, आघाडा, केना, करवंद तसेच गुळवेल, अश्वगंधा सारख्या वनौषधींचाही समावेश आहे.
-----------
या रानभाज्या पाहिल्यात का
आघाडा :
या भाजीमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; ही भाजी ‘पाचक’ असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो.
-----------
फांज :
ही दुर्मीळ वनस्पती असून, तिची भाजी करण्यासह भजीदेखील केली जातात. या भाजीच्या सेवनाने हृदय मजबूत होण्यासह डोळ्यांसाठी ती लाभदायक असते.
शेताच्या बांधावर ही भाजी उगवते.
-----------
कटुर्ले : रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी कटुर्ले गुणकारी असतात. तसेच पोटदुखी, जंत होणे यांसारख्या त्रासांमध्ये या भाजीचे सेवन केल्याने हा त्रास थांबतो. रानावनात या भाजीचे वेल येतात.
-----------
कुर्डूची भाजी : या भाजीच्या सेवनामुळे पोटाचे विकार नष्ट होऊन पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते. ही भाजी डोंगरात मिळते. बाजारात कातकरणी घेऊन येतात. चव साधारण माठाच्या भाजीप्रमाणेच असते.
-----------
या रानभाज्या झाल्या गायब
दुडीचे फूल :
हे फूल अत्यंत गुणकारी असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढून उत्साह कायम राहण्यास मदत होते. हाडातील ताप कमी होण्यासही यामुळे मदत होते.
-----------
कडमडवेली :
पांढऱ्या रंगाच्या या वेलीला कोवळे अंकुर येतात. या भाजीत पोटाचे आजार बरे करण्याची क्षमता आहे. या भाजीतील गुणधर्मांमुळे कफप्रवृत्तीही दूर होते.
-------------------
शक्तिवर्धक रानभाज्या :
कोट : नैसर्गिकरित्या उगवलेल्या व निसर्गातीलच अर्थात पावसाच्या पाण्यावर वाढलेल्या रानभाज्या शरीरासाठी मोठ्या लाभदायक आहेत. विविध रानभाज्यांचे औषधी गुणधर्म पाहिले तर प्रत्येक भाजीतून शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाभच होणारा असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा रानमेवा खाऊन आरोग्य स्वस्थ ठेवता येते.
- सुनीता लाहोरे, आहार तज्ज्ञ