अवर्षण, अतिवृष्टी, सिंचनाच्या साधनाचा अभाव या विपरित परिस्थितीमधून मानोरा तालुक्यातील काही कष्टकरी शेतकऱ्यांनी परिस्थितीकडे बोट दाखवून गप्पगार घरी बसून न राहता अपार कष्ट आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आपले, आपल्या कुटुंबीयांचे व इतरही अनुकरणीय शेतकऱ्यांना प्रगतीचीद्वारे खुली करून दिलेली आहे. बेलोरा शेत शिवारातील राष्ट्रीय महामार्गाला लागून काही एकर शेत शिवारामध्ये खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये पिकांचे व्यवस्थित नियोजन करून दररोज आपल्या खिशात खेळता पैसा कसा राहील अशा पिकांची कृषी अधिकारी कार्यालय मानोरा यांच्या मार्गदर्शनाने निवड शेतकरी मुंशीराम उपाध्ये करीत असतात.
मुंगशीराम उपाध्ये यांनी आपल्या शेत शिवारामध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनात उन्हाळी कोहळ्याची लागवड केलेली असून, आज रोजी एक हेक्टर लागवड क्षेत्रामधून दोन ते तीन क्विंटल कोहळे मानोरा आणि आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये १५ ते १८ रुपये दराने विक्री करून चांगली आर्थिक सुबत्ता साधत आहेत. उन्हाळी कोहळ्याच्या या शेतीवरच विसंबून राहिले नाही तर त्यांनी कोहळ्यांच्या या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून दहा गुंठ्यात काेथिंबीरची लागवड करून आतापर्यंत पंधरा हजार रुपयांच्यावर विक्री केलेली आहे. या उन्हाळी शेतीमध्ये मुंशीराम उपाध्ये यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्या अर्धांगिनी ही सहभाग नोंदवितात हे विशेष.