वाशिम : गत काही महिन्यांआधी खाद्यतेलाचे भाव चांगलेच भडकल्याने गृहिणींचे बजेट काेलमडले हाेते; परंतु आता आयात वाढल्याने तेलाचे दर काही अंशी कमी झाल्याने काही प्रमाणात गृहिणींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. वर्षभरानंतर खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याने चमचमीत खाद्यपदार्थांवर भर दिला जात आहे.
काेराेना संसर्गामुळे कधी बाजारपेठ बंद, तर कधी पाहिजे त्या प्रमाणात आयात हाेत नसल्याने तेलाचे भाव गगनाला भिडले हाेते. अशात अनेक गृहिणींना स्वयंपाकघर चालविणे कठीण झाले हाेते. तेलाचे भाव कमी हाेणार की नाहीत, अशी चिंता गृहिणींना हाेती; परंतु गत काही दिवसांपासून तेलाच्या भावात घट हाेत असल्याने दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत शेंगदाणा तेल १७० रुपये लिटर, तर साेयाबीन तेल १५० रुपये लिटर, असे भाव आहेत. करडईच्या तेलामध्ये काहीच चढ-उतार झालेला दिसून येत नाही. जिल्ह्यात सर्वांत जास्त साेयाबीन, शेंगदाणा व सूर्यफूल तेलांचा वापर हाेताे. या तेलांच्या दरामध्ये ३० ते ४० रुपयांपर्यंत घसरण आली आहे. तेल दरामध्ये अजून माेठ्या प्रमाणात घट येणार असल्याचे तेल व्यावसायिकांनी चर्चा करताना सांगितले. तेलाचे भाव दिवसेंदिवस कमी हाेणार असल्याची शक्यता नागेश काळे यांनी व्यक्त केली.
------------
गृहिणींमध्ये ‘थाेड़ी खुशी, थाेड़ा गम’
शेंगदाणा तेलाचेच भाव चांगल्यापैकी कमी झालेत; परंतु आराेग्यासाठी शेंगदाणा तेल घातक ठरू शकते. इतर तेलांच्या भावात २० ते ५० रुपयांचीच घट झाल्याने गृहिणींच्या बजेटमध्ये बराचसा फरक पडला असल्याचे बाेलले जात आहे; परंतु काहीअंशी का हाेईना तेलाचे भाव कमी झाल्याने दिलासा आहे.
--------
शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल
आमच्या घरी अनेक वर्षांपासून तेलवाण पीक घेऊन घाण्यावरून तेल काढून आणले जात हाेते; परंतु आजघडीला तेल काढून आणण्याचा खर्च व आपले तेल बी याचा विचार केला असता दोन्ही सारखेच पडतेय. त्यामुळे विनाकारण वेळ खर्च घालण्यात काही फायदा नसल्याने आम्ही तेल विकतचेच वापरताेय.
-भागवत खानझाेडे, जांभरूण, ता. वाशिम
अनेक वर्षांपर्यंत तेलघाण्यावरून तेल बीज देऊन घरी तेल आणल्या जायचे; परंतु सरळ घाण्यावरून तेल बी देऊन तयार करून आणलेले तेल फिल्टर हाेत नसल्याने अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे फिल्टर झालेले तेल बाजारातून विकत आणून वापर करीत आहाेत. परिवारही छाेटे झाल्याने आता तेल काढणे परवडत नाही.
-दशरथ वाटाणे, वाशिम