....................
वाशिममध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळले
वाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलोसह अन्य ठिकाणचा एक असे कोरोना विषाणू संसर्गाने बाधित दोन नवे रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी खबरदारी बाळगून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
....................
प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमार
शिरपूर जैन : लॉकडाऊनदरम्यान ८ ते ९ महिने व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने ऑटोचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. अशात शिरपूर येथे पर्यटकांची रेलचेलच नसल्याने ऑटोचालकांना सध्या प्रवासीच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
.......................
अडोळी येथे योग शिबिर उत्साहात
वाशिम : तालुक्यातील ग्राम अडोळी येथे बुद्धसासन फाउंडेशनने १७ जानेवारी रोजी योग व प्राणायाम शिबिर घेतले. योग प्रशिक्षक म्हणून सुधाकर नगरे यांचे मार्गदर्शन लाभले. योगाचे विविध प्रकार, प्राणायाम, कपालभाती, भ्रस्तीका याबाबत त्यांनी माहिती दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बुध्दसासन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पडघान, अॅड. पट्टेबहादूर, सतीश खंडारे, हरिष पडघान, संदीप पडघान, मधुकर पडघान, शरद खंडारे, प्रशांत पडघान, प्रमोद पडघान आदींनी परिश्रम घेतले.
...................
अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वाशिम : पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील कुठल्याच वाळूघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना अव्वाच्या सव्वा दर आकारून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. या गंभीर बाबींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
...................
मधुमक्षिका पालनाकडे वळण्याचे आवाहन
वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्रय रेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. या माध्यमातून भरीव प्रयत्न केले जात असून, महिलांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
................
जलसंपदाकडून कॅनॉलची दुरूस्ती
अनसिंग : रबी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी कालव्यांव्दारे सोडले जात आहे. काहीठिकाणचे कालवे नादुरूस्त झाले होते. त्याची जलसंपदाकडून दुरूस्ती केली जात आहे.
.................
सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले
तोंडगाव : परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण केल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचे ‘आत्मा’चे तालुका समन्वयक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितले.