वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा व तालुकास्तरावरील सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. यामध्ये कुचराई झाल्यास नाईलाजाने संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिला. दुरदृश्य प्रणालीद्वारे १५ एप्रिल रोजी झालेल्या तालुकास्तरीय शासकीय यंत्रणा प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच लग्न समारंभात २५ व्यक्ती व अंत्यसंस्कार प्रसंगी २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. संचारबंदी आदेशाची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी विविध पथके स्थापन करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यामध्ये हलगर्जीपणा केल्यास नाईलाजाने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
शहरी व ग्रामीण भागामध्ये भाजीपाला व फळविक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली असली तरी या विक्रेत्यांना वेगवेगळ्या परिसरात, विकेंद्रित स्वरुपात जागा उपलब्ध करून त्याठिकाणी विक्री करण्यास परवानगी द्यावी. एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदर दुकान, आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळणारा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जात आहे. या परिसरात केंद्र शासनाच्या दिशानिर्देशानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कुटुंबातील व्यक्तींची आरोग्य तपासणी, कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले.
निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी यावेळी प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यवाही, लसीकरण मोहीम विषयी माहिती दिली.