लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न म्हणून १५ आॅक्टोबर रोजी वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर सुमारे ११ हजार विद्यार्थी, महिलांनी एकत्र येत मानवी साखळीतून भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह (लोगो) साकारला.‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये जागतिक विक्रम म्हणून या उपक्रमाची नोंद झाल्याने, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हामध्ये असलेल्या हिरवा, पांढरा, केशरी, काळा व करड्या रंगाच्या टोप्या परिधान करून सर्व विद्यार्थी, महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकारला आहे.दरम्यान, जिल्हा निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित केलेल्या उपक्रमाची नोंद जागतिक विक्रम म्हणून ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत सलग तिसऱ्या वर्षी जागतिक विक्रम नोंदविला गेला. यापूर्वी २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ७ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो साकारला होता. त्यानंतर ८ मार्च २०१८ रोजी ८३१८ महिला व मुलींनी मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’चा लोगो साकारून विक्रम स्थापित केला होता. (प्रतिनिधी)
मानवी साखळीतून साकारले निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 4:28 PM