लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींची निवडणूक संपल्यानंतर, आता सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होत आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून काही पॅनलप्रमुखांनी सदस्यांना सहलीवर पाठविले, तर काही सदस्यांवर गावातच लक्ष ठेवले जात आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला, तर काहींनी आपली पत राखली. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आता सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार असल्याने मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सरपंचपदासाठी तीन, तीन प्रबळ दावेदार असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून सदस्यांना सहलीवरही पाठविले जात आहे, तर काही ठिकाणी सदस्यांवर गावातच लक्ष ठेवले जात असल्याचे दिसून येते. सरपंचपद मिळाले नाही, तर इच्छुक उमेदवार हे विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा धोका नाकारता येत नसल्याने सदस्य सांभाळून ठेवताना पॅनलप्रमुखांची चांगलीच कसरत होणार आहे. १५ व १६ फेब्रुवारी रोजी सहाही तालुक्यात, तर १७ फेब्रुवारी रोजी मानोरा व मालेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला वेटिंगवर राहावे लागणार, याकडे राजकीय क्षेत्रासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. १५ व १६ फेब्रुवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात तर १७ फेब्रुवारी रोजी मानोरा व मालेगाव तालुक्यात सरपंच पदाची निवडणूक होणार आहे.
- सुनील विंचनकरउपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम