वाशिम: वाशिम जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व राकाँच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी बंडखोरी केल्याने एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. उर्वरित तीन जागेवर काँग्रेसचे दोन तर राकाँच्या एका उमेदवाराचा विजय झाला. सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १२ जुलै रोजी संपुष्टात येत असल्याने ८ जुलै रोजी ही निवडणूक घेण्यात आली.जिल्हा परिषदेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, शिवसेना १0, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, भारिप-बमसं तीन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक असे पक्षीय बलाबल आहे. चार विषय समितीच्या सभापतिपदाची निवडणूक काँग्रेस-राकाँ-अपक्ष व भारिप-बमसंची आघाडी सहज जिंकेल, असा अंदाज वर्तविला जात होते. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मात्र सभागृहात काँग्रेसच्याच काही सदस्यांनी वेगळेच ह्यराजकारणह्ण शिजविले. दुपारी ३ वाजता हात उंचावून मतदानाला सुरुवात झाली. प्रथम समाजकल्याण समिती सभापती पदासाठी मतदान झाले असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पानुताई दिलीप जाधव यांनी भाजपाच्या रत्नप्रभा घुगे यांचा सात मताने पराभव केला. जाधव यांना २९ तर घुगे यांना २२ मते मिळाली. महिला व बालकल्याण विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या यमुना सीताराम जाधव यांनी शिवसेनेच्या रेखा सुरेश मापारी यांचा दोन मताने पराभव केला. जाधव यांना २७ तर मापारी यांना २४ मते मिळाली. दोन विषय समितीच्या सभापतीसाठी काँग्रेसचे सुधीर गोळे व राजेश जाधव, शिवसेनेचे विश्वनाथ सानप आणि राकाँचे देवेंद्र ताथोड निवडणूक रिंगणात होते. सर्वाधिक २७ मते घेऊन सुधीर गोळे विजयी झाले. दुसर्या पदासाठी काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने आणि काँग्रेसच्या एका सदस्याचे मतदान अवैध ठरल्याने शिवसेनेचे विश्वनाथ सानप एका मताने विजयी झाले. सानप यांना २५ तर राजेश जाधव यांना २४ व देवेंद्र ताथोड यांना २३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसचे विकास गवळी व सुखदेव मोरे या दोन सदस्यांनी सेनेचे विश्वनाथ सानप यांना मतदान केले तर काँग्रेसच्या ज्योती गणेशपुरे यांनी तीन उमेदवारांना मतदान केल्याने त्यांचे मत अवैध ठरविण्यात आले. यामुळे सेनेच्या उमेदवाराचा विजय सुकर झाला. राकाँचे देवेंद्र ताथोड व मीना भोने हे दोन सदस्य सेना-भाजपा युतीसोबत गेल्याचा फटकाही काँग्रेस-राकाँ युतीला बसला.
सभापती निवडणुकीत काँग्रेसला स्वकियांची बंडखोरी भोवली!
By admin | Published: July 09, 2016 12:56 AM