जिल्ह्यात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गावांमध्ये जुन्या पद्धतीचे विद्युत खांब उभे असून, त्यावरील ताराही जुनाट झाल्या आहेत. दरम्यान, वादळी वाऱ्याने त्यातीलच काही विद्युत प्रवाहीत खांब व तारा तुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यात जीवितहानी झाली. यासह रोहित्रांमधून सातत्याने विद्युत प्रवाह सुरू असताना रोहित्राच्या शेजारी जनावरे चारल्याने विद्युत शॉक लागून जनावरे दगावल्याचे प्रकारही २०२० या वर्षांत घडले आहेत. त्यातून वर्षभरात ३५ इसमांचा; तर १५पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. नियमानुसार संबंधितांना शासनाकडून आर्थिक सहाय्य व्हायला हवे. मात्र, त्यातील केवळ २५ जणांना मदत मिळाली आहे.
............................
बॉक्स :
१० जणांना मदत मिळालीच नाही
१) सन २०२०मध्ये वर्षभरात ३५ जणांचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. मात्र, त्यातील १० जणांना अद्याप मदत मिळालेली नाही.
२) मदत मिळविण्याकरिता महावितरणने निकष घालून दिलेले आहेत. त्याची पूर्तता झाली तरच अर्थसहाय्य केले जाते; अन्यथा मदत नाकारण्यात येते.
३) शेतशिवारांमध्ये वन्यप्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी विद्युत प्रवाहित तारांचे कुंपण घातले जाते. त्याचा शॉक लागून काही शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्यातील काहींना मात्र अद्याप मदत मिळालेली नाही.
.................
महावितरण कर्मचाºयांनाही शॉक
विद्युत प्रवाहित खांब व तारांचा शॉक लागून महावितरणमधील काही कर्मचारीदेखील जखमी झाल्याच्या घटना २०२० मध्ये घडल्या आहेत. असे असले तरी त्यात जीवितहानी झालेली नाही. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा दवाखान्याचा खर्च महावितरणने केला असून, अनेक कर्मचारी नव्या दमाने कामावर रूजू झालेले आहेत.
..............
विद्युत शॉक लागून कुणाचा जीव जाऊ नये, यासाठी महावितरणकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते. विशेषत: शेतशिवारांमध्ये पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने विद्युत प्रवाहित तारांचे कुंपण घातले जाते. या प्रकारामुळे वन्यप्राण्यांचा जीव जाण्यासोबतच वेळप्रसंगी शेतकरी, शेतमजुरांनाही अनावधानाने शॉक लागल्यास जीव जाऊ शकतो, अशाही काही घटना २०२०मध्ये घडलेल्या आहेत.
- आर. जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम