रिसोड (वाशिम): शहरी व ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी अनुक्रमे थ्री फेज व सिंगल फेज योजना कार्यान्वित आहेत. यामाध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. मात्र, ते धोकादायक पद्धतीने सताड उघडेच राहत असल्याने अपघातांची शक्यता बळावली असून महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
रिसोड तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात विजपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी गावठाण आणि कृषी फिडर बसविण्यात आलेले आहेत. त्यातील अनेक रोहित्र रस्त्यालगत असून, त्यातून विजेचा पुरवठा व्यवस्थित करण्यासाठी वितरण पेट्या लावण्यात येतात. या पेट्यांमध्ये असलेले उघडे फ्यूज तार धोकादायक असतात. त्यास स्पर्श झाल्यास प्राणहानी अटळ आहे. या पेट्या सहज हात लागेल किंवा स्पर्श होईल एवढ्याच अंतरावर खांबाला बसविलेल्या असतात. या पेट्यांना जनावरांचा स्पर्श झाल्याने ती दगावल्याच्या घटनाही यापूर्वी काहीठिकाणी घडल्या आहेत. याशिवाय रोहित्रातून विजपुरवठा खंडित झाल्याने अनेक शेतकरी या डिस्ट्रिब्यूशन बॉक्समधील फ्यूज स्वत:च दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात किंवा खासगी लाईनमनचा आधार घेतात. हा प्रकारही जीवघेणा ठरत असल्याने महावितरणने वेळीच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.