लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आली आहेत. त्यापैकी ९ बॅरेजेस परिसरात विद्यूतचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी उपकेंद्र उभारली जात आहेत. ५८ कोटींच्या या कामासाठी शासनाकडून आतापर्यंत ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. डिसेंबर २०२० अखेर सर्व उपकेंद्र पूर्ण करण्याच्या सूचना आहेत. असे असताना सद्य:स्थितीत केवळ ३ उपकेंद्रांचीच कामे पूर्ण होऊ शकली आहेत. कामाच्या संथ गतीमुळे नदीत पाणी असूनही सिंचन प्रक्रीया प्रभावित होत आहे.जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ७१६.४२ कोटी रुपये खर्चून बॅरेजेस उभारले; मात्र मुबलक प्रमाणात पाणी उपलबध होऊनही केवळ विजेअभावी ते सिंचनासाठी वापरता येणे अशक्य ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने बॅरेजेस परिसरात ९ विद्यूत उपकेंद्रांसह तत्सम सुविधांचे जाळे निर्माण करण्यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ आणि दुसºया टप्प्यात १३ असा ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. पुणे येथील एका कंपनीला उपकेंद्र उभारण्याची कामे देण्यात आली असून डिसेंबर २०१९ अखेर नऊपैकी नारेगाव, अनई आणि धामणी खडी हे तीन उपकेंद्र पूर्ण झाले आहेत. उर्वरित सहा उपकेंद्रांची कामे डिसेंबर २०१९ अखेर पूर्ण करण्याचे सक्त निर्देश कंत्राटदारास देण्यात आले आहेत; मात्र मुळातच कामे संथ गतीने सुरू असल्याने त्याचा थेट परिणाम सिंचन प्रक्रियेवर होत असल्याचे दिसून येत आहे.
बॅरेजेस परिसरात विद्यूतचे भक्कम जाळे उभे करण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत ५८ कोटींपैकी ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून ९ उपकेंद्रांची कामे केली जात आहेत. ३ उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत; तर उर्वरित ६ उपकेंद्रांची कामेही डिसेंबर २०२० अखेर पूर्ण होतील.- व्ही.बी. बेथारियाअधीक्षक अभियंता, महावितरण