लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महावितरण ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासह वीज बिल दुरुस्ती, तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने शिबिरांचे उपविभागनिहाय आयोजन करण्यात येत आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०१९ रोजी वाशिम येथे वाशिम शहरातील व वाशिम मंडळातील सर्वच तालुक्यातील ग्राहकांकरिता महावितरणच्या सर्वच उपविभागांत हे शिबिर होणार आहे.महावितरणच्यावतीने आयोजित शिबिरात वीजबील दुरुस्ती, घरगुती व इतर वर्गवारींची नवीन वीज जोडणी, वाढीव भार, नावामधील बदल-दुरुस्ती, मोबाईल क्रमांक नोंदणी तसेच इतर सुविधांचा लाभ, माहिती व मार्गदर्शन ग्राहकांना करण्यात येणार आहे. या शिबिरात ग्राहकांना अर्ज विनामूल्य उपलब्ध राहणार असून, ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीजदेयके सोबत आणावीत. शिबिराच्या दिवशी संबंधित कामाकरिता अभियंते,अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष येथे उपस्थित राहून तक्रारीचे निवारण तसेच या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी महावितरणच्या उपविभागांतर्गत आयोजित करण्यात येत असलेल्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वाशिम मंडळाकडून करण्यात आले आहे.
वीज बील दुरुस्ती, तक्रार निवारणासाठी महावितरणचे शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 5:25 PM