वाशिम : वाढीव वीज बिले आणि संभाव्य वीज दरवाढ या दोन्ही बाबींचा निषेध म्हणून जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सोमवारी स्थानिक पाटणी चौकात वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विज देयके आली आहेत. तसेच महावितरणने संभाव्य वीजदरवाढ घोषित केली आहे. या घटनेचा निषेध व अन्य मागण्यांसाठी विज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजु चौधरी, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, नगरसेवक राजु वानखेडे यांनी सोमवारी आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांंंच्या उपस्थितीत विज बिलाची होळी करण्यात आली. येत्या काही दिवसात विजेच्या दरात वाढ होत असल्याने सदरचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती राजु चौधरी यांनी दिली. विज ग्राहकांवर लादण्यात येत असलेली विज दर वाढ तसेच ग्राहकांना देण्यात येत असलेली अव्वाच्या सव्वा विज बिले ही ग्राहकांसाठी डोकेदुखी बनली असुन याबाबत विज नियामक मंडळाच्या सुनावणीमध्ये विज दरवाढी बाबत ग्राहकांच्या भावना पोहचविल्या जाणार आहेत. येत्या १९ जुलै रोजी विज नियामक मंडळाच्या बैठकीत वाशिम जिल्हयातील विज ग्राहकांना होत असलेला त्रास विज ग्राहकांच्या निवेदनाच्या रुपाने त्यांना देण्यात येईल, असे ग्राहक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आंदोलनामध्ये ज्ञानेश्वर वाघ, नामदेवराव हजारे, शालीग्राराम काळबांडे, सुरेश रत्नपारखी, विश्वनाथ काळे, गोपी महाले, मोहन चौधरी, शालीग्राम गावंडे, अरविंद उचित, शेषराव सावके, विनोद पट्टेबहादुर, कुंडलीक उदगिरे, किसन उदगिरे, प्रविण महाले, दामुअणा काळे, सुनिल मापारी यासह शेकडोजण उपस्थित होते.
वीज बिलांची होळी
By admin | Published: July 05, 2016 12:54 AM