वाशिम : येवती, रिठद परिसरात काही ठिकाणी विद्युत खांब, वीज रोहित्र जमिनदोस्त झाले असतानाही, अद्याप दुरूस्ती करण्यात आली नाही. वीज खांब व रोहित्राची दुरूस्ती करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अअशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नारायण आरु, शेतकरी गजानन शिंदे, निवास देशमुख व विवेकानंद देशमुख आदींनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे ११ मे रोजी निवेदनाद्वारे केली.
महावितरणच्या माध्यमातून काम करणारी परळी येथील एका एजन्सीच्या माध्यमातून येवती, रिठद परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात नवीन रोहित्र उभे करण्याचे काम केले जाते. येवती येथील शेतकरी गजानन रामचंद्र शिंदे यांच्या शेतातही वीज रोहित्र उभे करण्यात आले. विद्युत खांब व रोहित्र पडल्याने विद्युत व्यवस्था प्रभावित झाली आहे. संबंधित एजन्सीचे सुपरवायझर कातखेडे यांना गजानन शिंदे, निवास देशमुख व विवेकानंद देशमुख आदींनी संपर्क साधून वीज खांब व रोहित्र दुरूस्त करण्याची मागणी केली. परंतू, अद्याप दखल घेण्यात आली नाही, असे निवेदनात नमूद आहे. रिठद परिसरातही अनेक ठिकाणी वीज खांब, विद्युत रोहित्राच्या समस्या आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नारायण आरू यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.स्वत:च्या खर्चातून वीज खांब उभारणीरिठद, येवती परिसरात काही शेतकऱ्यांनी स्वतः पैसे खर्चून पडलेले वीज खांब पुन्हा उभे केले आहेत. राज्याचे उर्जामंत्री म्हणतात की सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. मग, शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब व विद्युत रोहित्र दुरूस्त करण्यास प्रचंड दिरंगाइ का? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला.