वाशिम : मंगरुळपीर शहरातील रशीद नगर, अक्सा कॉलनीतील गत काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. याबाबत महावितरण अभियंता यांना कळवूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नसल्याने संतप्त ग्राहकांनी मंगरुळपीर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालय परिसरात शनिवारी (दि.२) रोजी ठिय्या आंदोलन केले.
रशीद नगर, अक्सा कॉलनीतील गेल्या अनेक दिवसापासून वीज समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. कॉलनीला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्र जळाला आहे. या रोहित्रावर मदीना नगर येथील भार टाकलेला असून अधिक भारामुळे वारंवार ४ ते ५ रोहित्र जळाले आहेत. याबाबत मंगरुळपीर येथील अभियंता यांना विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार कळविण्यात आले. मात्र त्यानंतरही रोहीत्र दुरुस्त करण्यात आले नाहीत. परिणामी परिस्थिती जैसै थे, असून ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रशीद नगर व अक्सा कॉलनी येथील रोहित्र वेगळे करुन दुसऱ्या भागाचा भार टाकू नये व याठिकाणी सुरळीत वीजपुरवठा करावा या मागणीसाठी वीज ग्राहकांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी आंदोलकांनी केली.