वाशिम: एकामागून एक कोसळणार्या नैसर्गिक व मानवी संकटातून स्वत:ला सावरत असलेला बळीराजा रब्बी पेरणीपूर्वी विद्युत पुरवठय़ाच्या समस्येने हैराण झाल्याचे दिसून येते. गावठाण फिडर आणि विद्युत रोहित्रांच्या समस्येमुळे रब्बीची पेरणी प्रभावित झाली आहे. खरीप हंगामात निसर्गाने यावर्षीही दगा दिल्याने जिल्हय़ातील शेतकरी पुरता खचून गेला. कर्जाची परतफेड होईल, इतपतही उत्पादन हाती आले नसल्याने शेतकर्यांची झोप उडाली आहे. ऐन हंगामात शेतमालाचे बाजारभाव पडतात, याचा प्रत्यय यावर्षी शेतकर्यांना येत आहे. एरवी पाच हजारांच्या आसपास राहणारा सोयाबीनचा बाजारभाव आता ३३00 ते ३७00 या दरम्यान स्थिरावला असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे. खरिपाची कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी पेरणीवर पूर्णपणे विसंबून आहे. सिंचनाची सुविधा असणार्या शेतकर्यांकडे पाणी उपलब्ध आहे; मात्र पुरेशा प्रमाणात वीज नसल्याने शे तकरी धास्तावले असल्याचे दिसून येते. याचा विपरित परिणाम रब्बीच्या पेरणीवर होत असल्याचे दिसून येते. रब्बी हंगामात एक लाख हेक्टर क्षेत्रफळावर गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. आतापर्यंत सात टक्क्यावर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. जिल्हय़ात १७0 ते १९0 च्या आसपास विद्युत रोहित्र जळाले आहेत. त्या तुलनेत विद्युत रोहित्रांची उपलब्धता कमी असल्याने शेतकर्यांना वीजपुरवठा मिळेनासा झाला आहे. ३५ ते ४0 ठिकाणच्या गावठाण फिडरमध्येही तांत्रिक बिघाड आल्याने वीज पुरवठा ठप्प असल्याची माहिती आहे.
रब्बी पेरणीत विजेचा गतिरोध
By admin | Published: October 26, 2015 1:53 AM