रिसोड : १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार, कर्तव्यात कसूर, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे आदी ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी रिसोड तालुक्यातील जवळा येथील ग्रामसेवकाला निलंबित केले आहे. आर. पी. गोटे असे निलंबित ग्रामसेवकाचे नाव आहे.
जवळा येथे ग्रामसेवकाच्या कारभारासंदर्भात संतोष राठोड यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. आर. पी. गोटे यांनी सरपंच व काही सदस्यांना हाताशी धरून पंधराव्या वित्त आयोगाचे निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार केला, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन नाही, नियमाची पायमल्ली आदी मुद्दे उपस्थित करून चौकशी करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला होता. याबाबत लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची चौकशी केल्यानंतर दोषी आढळून आल्याने अखेर गोटे यांना निलंबित करण्यात आले. डिजिटल स्वाक्षरीमुळे एकाही ग्रामपंचायतने १५ व्या वित्त आयोगाचे पैसे काढले नाही. तशी शासनाची परवानगी नाही. तरीही पैसे काढले आणि वाटून घेतले. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी राठोड यांनी केली. यापूर्वीही लोनकर, अंभोरे, वीर असे तीन ग्रामसेवक जवळा ग्रामपंचायतमध्ये असताना निलंबित झाले होते, हे विशेष.