लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, १४ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यात १०९५ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात आरोग्य विभागाने आजवर केलेल्या ४९६३ रॅपिड अॅन्टिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाढता कोरोना विषाणू संसर्ग लक्षात घेता रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट मोहिमेला जिल्हा आरोग्य विभागाने अधिक वेग दिला असून, प्रत्येक तालुक्यात ही मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढीचा वेग अधिकच तेजीत असून, यामध्ये शुक्रवारी ९ जणांची भर पडली. बाहेरगावावरून परतणाºया नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळेच बाधित रुग्ण आढळलेल्या गावांत आरोग्य विभागाने रॅपिड अॅन्टिजेन टेस्टद्वारे तपासणी सुरू केली आहे. यात आजवर ४९६३ लोकांची जिल्हा आरोग्य विभागाने तपासणी केली असून, त्यात २६७ लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.जिल्ह्यातील शहरांसह ८८ गावांत कोरोना संसर्गाने शिरकाव केला आहे. त्यात १०८८ लोकांना कोरोना विषाणू संसर्ग झाला असून, बाहेरच्या जिल्ह्यात उपचार घेणाºया दोघांसह एकूण २० जणांचा मृत्यू झाला, ६९८ लोकांनी कोरोनावर मातही केली, तर ३७० लोकांवर अद्याप उपचार करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी रॅपिड अॅन्टिजेन टेस्टवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे बाधिताच्या संपर्कातील रुग्ण शोधून काढण्यास मदत मिळत असल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून येत आहे.
जिल्ह्याला आणखी पाच हजार किट मिळणारजिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तातडीने तपासणी व्हावी, त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावेत म्हणून आरोग्य विभागाने रॅपिड अॅन्टिजेन टेस्टचा आधार घेतला आहे. या किट आमदार निधीतून उपलब्ध करण्यात येत असून, जिल्ह्यात या अंतर्गत आणखी ५००० हजार रॅपिड टेस्ट किट शनिवारपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी शक्य होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.