लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. अनसिंग-मंगरुळपीर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर मंगरुळपीर ते अनसिंग दरम्यान एसटी बसगाड्यांशिवाय काळीपिवळी, आॅटोरिक्षा या खाजगी प्रवासी वाहनांसह मालवाहू ट्रक मोठ्या संख्येने धावतात. आता या रस्त्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. तथापि, गेल्या दिड वर्षापासून या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असतानाही मार्गाची दुरुस्ती करण्याची तसदी मात्र घेण्यात आलेली नाही. ठिकठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेतच शिवाय कुठे कुठे, तर आठ फुट अंतरापर्यंतच मार्गच उखडला असून, निव्वळ खडीवरून वाहने धावत आहेत. यामुळे मार्गावर प्रवास करताना केवळ शिल्लक वेळच लागत नाही, तर खड्डे वाचविण्याचा प्रयत्न चालक करीत असल्याने वाहन सारखे आदळत असल्याने प्रवाशांची हाडेही खिळखिळी होत आहेत. या मार्गावर चालकाचे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशीच स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. याच मार्गावरील तीन नाल्यांवर असलेल्या पुलांची उंची आधीच कमी असताना त्या ठिकाणी मार्गाची अत्यंत दूरावस्था झाल्याने एखादवेळी खड्डे वाचविताना वाहन पुलात कोसळण्याची भितीही आहे. यातील एक पुल नांदगावनजिक, दुसरा कुंभीनजिक, तर तिसरा पुल जवळ्यानजिक आहे.
मंगरुळपीर आगाराची हिंगोली बसफेरी बंद मंगरुळपीर येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी अनसिंग मार्ग जवळचा असल्याने या मार्गावर मंगरुळपीर आगाराकडून वर्षभरापूर्वी हिंगोलीसाठी बसफेरी सुरू करण्यात आली होती; परंतु अवघ्या काही दिवसांतच या मार्गाची दूरवस्था झाल्याने या मार्गावरून बस चालविणे कठीण झाले, तसेच मार्गावरील खड्ड्यांमुळे वृद्ध प्रवाशांसह बालकांना प्रवासादरम्यान अतोनात त्रास सहन करावा लागत होता. त्याशिवाय बसचेही नुकसान होण्याची शक्यता होती. याच कारणामुळे मंगरुळपीर आगाराकडून ही बसफेरी बंद करण्यात आली.