वाशिम : अकोला नाका भागात असलेल्या टेम्पल गार्डनच्या बाजूला वास्तव्य करणार्या अतिक्रमकांनी ३ सप्टेंबर रोजी स्वत:हून आपले अतिक्रमण हटविले. नगरपरिषदेच्यावतीने या परिसरात कॉम्पलेक्स बांधायचे असल्याने अतिक्रमण हटविण्यात यावे, अशा सूचना सर्व अतिक्रमकांना २ सप्टेंबर रोजी देण्यात आल्या होत्या. सूचनेनंतरही अतिक्रमण न हटविल्यास कारवाई करण्याचेसुद्धा बजावले होते. कोणत्याही परिस्थितीत हे अतिक्रमण हटणारच असल्याने व पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण करता येणार नसल्याने या भागातील अतिक्रमकांनी २ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच स्वत:हून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. ३ सप्टेंबर रोजी या रस्त्यावरील बहुतांश अतिक्रमण हटल्याने रस्ता मोकळा झाला होता. अतिक्रमण निर्मूलन पथक येऊन राहिलेले अतिक्रमण काढणार असल्याने लघुव्यावसायिकांनी आपली दुकाने न थाटता पथकाची प्रतीक्षा केली. अतिक्रमण हटाव पथक न आल्याने अनेक लघुव्यावसायिकांना २ सप्टेंबर रोजी मिळालेली माहिती नगरपरिषदेच्यावतीनेच देण्यात आली होती किंवा कसे, अशी शंका निर्माण होत आहे. लघुव्यावसायिकांचे या ठिकाणी मोठया प्रमाणात अतिक्रमण होते. ते हटविल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पर्यायी जागा देऊन रोजीरोटीचा प्रश्न मिटविण्याची मागणी अतिक्रमणधारकांकडून केली जात आहे.
अतिक्रमकांनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण
By admin | Published: September 04, 2015 1:28 AM