कारंजा लाड - शहरातील महात्मा फुले चैकातील जुना सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूस काही अवैध होटेल व्यावसायिकांनी व रहिवासीयांनी केलेल्या अतिक्रमणावर कारंजा नगर परिषदेच्या वतीन ५ डिसेंबर रोजी दुपारी अतिक्रमण हटाओ मोहिम राबविण्यात आली.
मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब वर्ग नगरपालिकेला ‘नॅशनल हेल्थ अर्बन आॅर्गनायझेशन’च्यावतीने दवाखान्यासाठी सुसज्ज इमारत मंजूर झाली आहे. त्यानुसार कारंजा नगर परिषदेलाही दवाखाना इमारत मंजूर झाली असून, त्याकरिता कारंजा शहरातील जूना सरकारी दवाखान्याची जागा मोकळी करून दिली जाणार आहे. या परिसरात अतिक्रमण झाल्याने सदर अतिक्रमण हटविणे आवश्यक होते. या उद्देशाने जूना सरकारी दवाखाना परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मुख्याधिकारी प्रमोद वानखडे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने अतिक्रमण हटाओ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यावेळी कारंजा पोलीसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.