नंदकिशाेर नारे, वाशिम: मालेगांव वन परिक्षेत्रातील मौजे बोरगाव येथील वन विभागाच्या ६२ एकर जमिनी वरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी जेसिबीच्या सहाय्याने खोल सलग समतल चर खोदण्याची कारवाई वनविभागाच्या वतीने करण्यात आली.
उपवनसंरक्षक अभिजित वायकोस व सहाय्यक वनसंरक्षक विपुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास मोरे यांनी केलेल्या कारवाईमुळे वन जमिनींवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मालेगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजे बोरगांव येथील कक्ष क्रमांक ई १३ मधिल ६२ एकर वन जमीनीवर काही ईसमांनी वैयक्तिक स्वार्थासाठी बेकायदेशीररित्या ६२ एकर वनजमिनींवर अतिक्रमण केले होते. गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणीत जमीनीवर पिक पेरणी करत होते . अतिक्रमणामुळे वन्य जीवांचे अधिवास नष्ट होतात, पर्यावरणचा ऱ्हास होतो. त्यामुळे वन व वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात येते ते टिकवून ठेवण्याकरिता अतिक्रमण निर्मूलन करणे गरजेचे असल्याने ही बाब हेरून वन विभागातील बेकायदेशीर अतिक्रमण निष्कासित करण्याची धडक मोहिम सुरू केली आहे . त्यानुसार सदर अतिक्रमण निर्मूलन करण्यात आले.
सदर अतिक्रमणीत वन क्षेत्रामध्ये वनविभागाच्यावतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोल सलग सम पातळी चर खोदण्यात आले आहेत. अतिक्रमण निष्कासित करण्या करिता सहाय्यक वनसंरक्षक विपुल राठोड, यांच्या सह वाशिम वन विभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी , वनपाल, वनरक्षक, वन मजूर तसेच जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे अधिनस्त पोलिस कर्मचारी, महसूल विभागाचे चे मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.