लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी यासाठी ४.५९ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे.वाशिम जिल्ह्यात गतवेळच्या खरीप हंगामात १६ आॅगस्ट २०१८ ते १९ आॅगस्ट २०१८ दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झाले. त्यात प्रामुख्याने कारंजा, मानोरा तालुक्यातील शेतकºयांचे अधिक नुकसान झाले. अनेक शेतकºयांची शेतजमीन यादरम्यान खरडून गेली. त्यामुळे त्यांना रब्बीची पिकेही घेता आली नाहीत. आॅगस्ट २०१८ मध्ये ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीत ६ हजार ७२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने पीक नुकसानाची संयुक्त पाहणी करून पंचनामे केले. त्यानुसार, शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सविस्तर अहवाल पाठवित ४.५९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी तीन महिन्यांपूर्वी नोंदविली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंतदेखील या अहवालाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची आशा मावळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 3:14 PM