लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १७ व १८ मे रोजी जिल्ह्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वीज ग्राहकांशी थेट संवाद साधला. त्यानुषंगाने प्राप्त तक्रारी तत्काळ निकाली काढा, ३० मे पासून वीज ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष शिबिर, मेळावे घ्या, असे स्पष्ट निर्देश देऊनही वीज ग्राहकांच्या समस्यांना महावितरणने अद्याप गांभीर्याने घेतलेले नाही. वीज देयकातील त्रुटी दूर करण्यासंबंधी ३० मे पासून शिबिर घेण्याच्या निर्देशाचीही अवहेलना झाल्याचे सिद्ध होत आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान १८ मे रोजी महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रांगणात जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी विजेसंदर्भातील अडीअडचणी जाणून घेत, त्या विनाविलंब निकाली काढण्याचे निर्देश महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी यासंदर्भातील मुद्यांवर प्रकाश टाकत असताना वीज देयकातील त्रुटी दूर करणे, मीटर रिडिंग न घेताच देयक देणाऱ्या एजन्सीविरुद्ध कारवाई करणे, कृषी पंप वीज जोडणीसाठी कंत्राटदारांच्या कामगारांकडून अवैध पैशांची मागणी होत असल्यास त्याची चौकशी करणे, यासह इतर प्रश्न तडकाफडकी निकाली काढण्याबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील ग्राहकांनी वीज देयकांच्या अनुषंगाने दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेत ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांकरिता ३० मे पासून विशेष शिबिर, मेळावे घेऊन वीज देयकांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देशदेखील दिले होते. मात्र, महावितरणने यासंबंधी एकही शिबिर अथवा मेळावा अद्याप घेतलेला नाही. इतरही साचून असलेले प्रश्न अद्याप ह्यजैसे थेह्ण आहेत. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांचा झंझावाती दौरा बहुतांशी ह्यवांझोटाह्ण ठरल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पीडित वीज ग्राहकांमधून उमटत आहेत. ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान घेण्यात आलेल्या जनता दरबारात उपस्थित झालेल्या विविध समस्या सध्या निकाली काढणे सुरू आहे. यासह वीज ग्राहकांकडे असलेली १० कोटी रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी वसूल करण्याकडेही विशेष लक्ष पुरविले जात आहे. वीज देयकांमधील त्रुटी दूर करण्यासंबंधी लवकरच शिबिर आणि मेळावे घेऊन ग्राहकांच्या अडचणी दूर केल्या जातील.- विजय मेश्रामकार्यकारी अभियंता, महावितरण
ऊर्जामंत्र्यांचा दौ-यानंतरही समस्या कायमच!
By admin | Published: June 04, 2017 5:28 AM