लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सिंचन विहिरीच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी महिला शेतकऱ्याला १२ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लघुसिंचन उपविभाग कारंजाच्या कनिष्ठ अभियंत्याला २३ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. रविनंदन अनंत सपकाळ असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत महिला शेतकऱ्याला सिंचन विहीर मंजूर झालेली आहे. या विहिरीचे अडीच लाख रुपये अनुदानही मंजूर झाले असून, त्यापैकी ९५ हजार रुपये अनुदान मिळालेले आहे. उर्वरित एक लाख ५५ हजार रुपये अनुदानाचा धनादेश देण्यासाठी तक्रारदार महिला शेतकरी ही लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग कारंजाचे कनिष्ठ अभियंता तथा लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग मंगरूळपीरचे प्रभारी रविनंदन सपकाळ (वय ५७) यांना भेटली होती. सदर धनादेश देण्यासाठी सपकाळ यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार १९ आॅगस्ट २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने २५ आॅगस्ट २०१६ रोजी पडताळणी केली असता, रविनंदन सपकाळ यांनी लाचेची मागणी करून स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले, तसेच दुसरा आरोपी खासगी इसम अमोल वानखेडे रा. देवठाणा ता. मंगरूळपीर याने पडताळणी दरम्यान सपकाळ यांना १० हजार रुपये लाचेची रक्कम देण्यास प्रोत्साहन दिल्याचे निदर्शनात आले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ मे २०१७ रोजी मंगरूळपीर येथून कनिष्ठ अभियंता सपकाळ याला ताब्यात घेतले तर अमोल वानखेडे हा आढळून आला नाही. उपरोक्त आरोपींविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार २३ मे रोजी मंगरूळपीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक आर.व्ही. गांगुर्डे यांच्या पथकाने केली.गुन्हा दाखल करण्यास विलंबसिंचन विहिरीच्या अनुदानाचा धनादेश देण्यासाठी लाच मागितल्याची बाब २५ आॅगस्ट २०१६ रोजी पडताळणी दरम्यान सिद्ध झाली होती. याप्रकरणी २३ मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या काळात फिर्यादी महिला उपस्थित न झाल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब लागला, असे एसीबीने स्पष्ट केले.
महिला शेतकऱ्याला लाच मागणारा अभियंता जेरबंद
By admin | Published: May 24, 2017 1:54 AM