वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया कुरळा प्रकल्पाची पाणीपातळी शून्यावर पोहचल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. दरम्यान, हा प्रश्न निकाली काढण्याकरिता चाकातिर्थ प्रकल्पावरून कुरळा धरणात पाणी सोडण्यासाठी १.३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यातून पाईपलाईन टाकण्याचे काम सद्या सुरू असून ७.८१ किलोमिटरपैकी ६ किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण करून मालेगावकरांना मुबलक पाणी पुरविले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी सोमवारी दिली.मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान-मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी चाकातिर्थ प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने या प्रकल्पातून कुरळा धरणापर्यंत पाणी आणण्यासाठी मालेगाव नगर पंचायतने प्रस्ताव तयार करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह इतर संबंधित यंत्रणांकडे पाठविला होता. त्यास १२ फेब्रुवारी रोजी मान्यता मिळाली आणि योजनांतर्गत काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यानुसार, ८ मार्च रोजी या योजनेच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर पाईपलाईन टाकण्याच्या कामाची जबाबदारीस सोपविण्यात आली. त्यानुसार, संबंधित यंत्रणेने दिवसरात्र मेहनत घेवून पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. त्यामुळेच आजरोजी ६ किलोमिटरपेक्षा अधिक पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन दिवसात मार्गी लागणार आहे. त्यानंतर मालेगावकरांना मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती जीवने यांनी दिली.
मालेगावकरांना लवकरच मिळणार मुबलक पाणी; ६ किलोमिटर पाईपलाईनचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:57 PM
वाशिम : मालेगावकरांना मुबलक पाणी पुरविले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी सोमवारी दिली.
ठळक मुद्दे पाईपलाईन टाकण्याचे काम सद्या सुरू असून ७.८१ किलोमिटरपैकी ६ किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे. मालेगाव शहरालगतच काही अंतरावर कोल्ही, केळी आणि चाकातिर्र्थ हे लहान-मोठे प्रकल्प आहेत.