या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे यांनी महाआवास अभियानामध्ये जिल्ह्याने केलेल्या कामगिरीविषयी माहिती दिली. या अभियानांतर्गत घरकुलांना मंजुरी, भूमिहीन लाभार्थ्यांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणे, निधीच्या प्रथम हप्त्याचे वितरण व पूर्ण घरकुले या निकषांच्या आधारावर जिल्ह्यातील उत्कृष्ट तालुका, ग्रामपंचायती, क्लस्टर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
०००००
कारंजा तालुका प्रथम
सर्वोत्कृष्ट तालुके गटात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कारंजा, मंगरूळपीर व मानोरा यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनांमध्ये रिसोड, मंगरूळपीर व मालेगाव यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. संबंधित पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांचा पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
०००००
लोणी ग्रामपंचायत प्रथम
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती गटामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील लोणी व चिचंबापेन ग्रामपंचायतीने अनुक्रमे प्रथम व द्वितीय तर मानोरा तालुक्यातील उमरी खु. ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत रिसोड तालुक्यातील बाळखेड, मालेगाव तालुक्यातील भेरा व कारंजा तालुक्यातील मनभा ग्रामपंचायतीने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांचाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
००००००
क्लस्टर गटात चिंचबाभर प्रथम
सर्वोत्कृष्ट क्लस्टर गटात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रिसोड तालुक्यातील चिंचबाभर, कारंजा तालुक्यातील कामरगाव व मानोरा तालुक्यातील फुलउमरी क्लस्टरने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, कारंजा तालुक्यातील धनज बु. व मानोरा तालुक्यातील कुपटा क्लस्टरने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.