वाशिम : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास १३ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अयोग्य मंजुरी पत्र सादर केलेले अर्जदारही या मुदतीत पुन्हा मंजुरी पत्र सादर करून शकतील, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी बुधवारी सांगितले.
जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थांना सदर याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या. पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थाकडून या योजनेच्या शासन निर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीन आयडीद्वारे १३ एप्रिल २०१८ पर्यंत सादर करावयाचे आहे. कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा १७.६० लाख रुपये राहील व त्यानुसार ५ वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम ५.९० लाख रुपये पर्यंत राहील, ही अट वित्तीय संस्थेस मान्य असल्याचे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. कर्ज मंजुरीबाबतचे संपूर्ण अटी व शर्ती यांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, असे जिल्हा उपनिबंधक कटके यांनी स्पष्ट केले.