लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या तब्बल ९७ हजार ५७१ लाभार्थींच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. संबंधित लाभार्थींनी ५ डिसेंबरपर्यंत त्रूटींची दुरूस्ती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमिन असलेल्या शेतकऱ्यांना तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजर रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेंतर्गत जिल्हयातील १ लाख ४७ हजार १०० शेतकरी कुटूंबाचा डाटा लाभार्थी म्हणून पाठविण्यात आला आहे. यापैकी ९७ हजार ५७१ लाभार्थ्यांच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आढळून आलेल्या आहेत. या चुका दूरुस्त करणे अत्यंत आवश्यक असून, आधारकार्डशी संबंधित चुका दूरुस्त न झाल्यास आधार क्रमांकावर आधारित निधी हस्तांतरीत करण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहे. अशा सर्व याद्या येत्या दोन दिवसात प्रत्येक गावात प्रसिध्द करण्यात येणार आहे. ज्या लाभार्थींची नावे या यादीत आहे, त्या लाभार्थ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हीस सेंटरला भेट देवून आधारकार्ड व बचत खाते, पुस्तकांची छायांकित प्रत कॉमन सर्व्हीस सेंटरच्या केंद्र चालकाकडे देऊन आवश्यक दूरुस्ती करुन घ्यावी लागणार आहे. ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिमही राबविण्यात येणार आहे. दुरूस्तीसाठी आजपासून जिल्ह्यात विशेष मोहिमप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या ९७ हजार ५७१ लाभार्थींच्या आधार संबंधित माहितीमध्ये अंशत: त्रूटी आहेत. या त्रूटींची दुरूस्ती करताना लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हयात २९ नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या विशेष मोहिमेचा लाभ संबंधित शेतकरी कुटूंबानी घेवून आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी केले.
९७ हजार लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये त्रूटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 2:38 PM