.................
नायलॉन मांजाची सर्रास विक्री
अनसिंग : पतंगीला लावण्यात येत असलेल्या नायलॉन मांजामुळे दरवर्षी दुर्घटना घडतात. त्यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर शासनाने प्रतिबंध लादले आहेत. असे असताना अनसिंग परिसरात सर्रास मांजा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे.
................
कलावंतांकडून समाजप्रबोधन
तोंडगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटकाळात समाजप्रबोधनाचे सर्वच कार्यक्रम थांबले होते. यामुळे रानोमाळ भटकून पोटाची खळगी भरणाऱ्या कलावंतांवरही उपासमारीची वेळ ओढवली होती. आता मात्र समाजप्रबोधनाचे कार्यक्रम सुरू झाले असून, तोंडगाव येथे रविवारी कलावंतांनी कार्यक्रम सादर केला.
..............
अतिक्रमणाचे सर्वेक्षण करण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश द्यावे व अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी महेश धोंगडे यांनी शुक्रवारी केली.
..................
धोका टळला नसताना प्रवाशांची बेफिकिरी
शेलूबाजार : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप टळला नसताना खासगी वाहनांद्वारे ग्रामीण भागात प्रवास करणारे प्रवासी बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. तोंडाला मास्क न लावता प्रवास केला जात असल्याचे रविवारी पुसद नाका येथे पाहावयास मिळाले.
.............
शौचालयांसाठी रेती देण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्यात तीन हजार शौचालयांचे बांधकाम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. मात्र रेतीच उपलब्ध नसल्याने ही कामे प्रभावित होत आहेत. तथापि, शौचालयांसाठी लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी छावा संघटनेचे मनीष डांगे यांनी जि.प.कडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
.................
चुकीच्या धोरणांप्रती कंत्राटी कामगार आक्रमक
वाशिम : महावितरणला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या एजन्सीने कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक काही कामगारांना कामावरून कमी केले. हे धोरण चुकीचे असून संबंधित एजन्सीच्या विरोधात कंत्राटी कामगार आक्रमक झाले आहेत.
.................
वाशिममध्ये बुधवारी आरोग्य शिबिर
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, २० जानेवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र, कान, घशाचे आजार जडलेल्यांची यावेळी तपासणी होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.
..................
महामार्गावरील वाहतूक वारंवार प्रभावित
वाशिम : शहरातील अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका आणि पुसदकडे जाणाऱ्या मार्गावर वाहने तासन्तास खोळंबत असून, अनेक वेळा रुग्णवाहिकाही अडकून पडत असल्याने मोठी समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
...................
एक्स-रे मशीनसाठी ५६ लाखांचा निधी
वाशिम : नीती आयोगाकडून मिळालेल्या ७.८५ कोटी रुपयाच्या निधीतील ५६.२० लाख रुपये खर्चून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये क्षयरोग रुग्णांसाठी एक्स-रे मशीन बसविण्यात येणार आहे.
...................
दोन उपकेंद्रांची कामे प्रलंबित
वाशिम : सेनगाव (जि.हिंगोली) येथील १३२ के.व्ही. पॉवरहाऊसमधून विद्युत प्रवाह घेण्यासाठी लाईन टाकण्याचा प्रश्न रखडण्यासोबतच दोन उपकेंद्रांची कामेही प्रलंबित आहेत. यामुळे पैनगंगा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना सिंचनात अडथळा जाणवत आहे.
.....................
मिरची बीजोत्पादनाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
वाशिम : घाटा (ता.मालेगाव) येथील गजानन दाभाडे व बबन कुटे यांच्या शेतातील मिरची बीजोत्पादन व मल्चिंगसह शेततळ्याची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी शुक्रवारी पाहणी केली.
...................
‘त्या’ एस.टी. फेऱ्या सुरू होणार
वाशिम : २५ पेक्षा कमी भारमान असल्याचे कारण दाखवून वाशिम आगारांतर्गतच्या १० एस.टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र प्रवाशांची संख्या वाढत चालल्याने या फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती आगारप्रमुख विनोद इलामे यांनी दिली.
....................
पाण्याबाबतच्या जनजागृतीचे कार्य ठप्प
वाशिम : नाबार्डने पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी अभियान हाती घेतले होते. त्यास ४ सप्टेंबर २०१९ रोजी प्रारंभ झाला. या अभियानात जिल्ह्यातील ८४ गावांमध्ये सुरुवातीला उपक्रम घेतल्यानंतर जनजागृतीचे कार्य पूर्णत: ठप्प पडले आहे.
......................
अनई, धोडप येथील उपकेंद्र कार्यान्वित
वाशिम : विद्युत पुरवठ्यात उद्भवणारा अडथळा दूर करण्यासाठी आठ विद्युत उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहेत. यासह अनई आणि धोडप येथील ३३ के.व्ही.चे उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
......................
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण
वाशिम : जिल्ह्यातील गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ग्रामस्थांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती अभियानाचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांनी दिली.