वाशिम : गत चार दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील १२५ जलप्रकल्पांत सरासरी १६.१८ टक्के जलसाठा झाला आहे. अद्यापही तब्बल ६६ प्रकल्प शून्यावर आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७३.३३ मिमी. पाऊस झाल्याची नोंद आहे.वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होईल, अशी अपेक्षा असताना, प्रत्यक्षात समाधानकारक वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात केवळ मृत जलसाठा आहे. तर एकबूर्जी प्रकल्पात १0.७८ आणि अडाण प्रकल्पात २३.५४ टक्के जलसाठा आहे. १२२ लघू प्रकल्पांत सरासरी १५.७0 टक्के जलसाठा आहे.वाशिम तालुक्यातील ३१ लघु प्रकल्पांत सरासरी २0.६0 टक्के जलसाठा असून, १७ प्रकल्प शून्यावर आहेत. अर्थात या जलाशयांमध्ये मृत जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील २२ लघू प्रकल्पांत सरासरी १0.७९ टक्के जलसाठा असून, १३ प्रकल्पात मृत जलसाठा आहे. कारंजा तालुक्यातील १४ लघू प्रकल्पांत ११.३0 टक्के जलसाठा असून, तीन प्रकल्प शून्यावर आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील १५ लघू प्रकल्पांत सरासरी १0.३७ टक्के जलसाठा असून, सहा प्रकल्प शून्यावर आहेत. रिसोड तालुक्यातील १७ लघु प्रकल्पांत सरासरी केवळ १.३९ टक्के जलसाठा वरूड बॅरेजचा अपवाद वगळता उर्वरित १६ प्रकल्प शून्यावर आहेत. मानोरा तालुक्यातील २३ लघु प्रकल्पांत सरासरी ३५.५१ टक्के जलसाठा असून, पाच प्रकल्पांत मृत जलसाठा आहे.
संततधार; तरीही ६६ प्रकल्पांची जलपातळी शून्यच!
By admin | Published: July 13, 2016 2:27 AM