संतोष वानखडे / वाशिम
नवनवीन संशोधन, वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी उपक्रम, अत्याधुनिक सोयी-सुविधांनीही वाशिम जिल्ह्यातील अर्भक मृत्यू दराचा आकडा किंचितही कमी केला नसल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक माहिती हाती आली आहे. २00७ मध्ये असलेले २४.९७ टक्के अर्भक मृत्यू दराचे प्रमाण २0१३ मध्येही २४.५५ वरच स्थिर राहिले. दुसरीकडे माता मृत्यू दराचा आकडा मात्र निम्म्यापेक्षाही खाली आणण्यात याच आरोग्य यंत्रणेला समाधानकारक यश येत आहे. २00७ ते २0१३ या कालावधीतील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अर्भक मृत्यू दर व माता मृत्यू दराच्या आकडेवारीतून काही समाधानकारक तर अनेक धक्कादायक पैलू बाहेर येत आहेत. २00७ मध्ये माता मृत्यू दर हा दर हजारी ६२ होता. २00८ मध्ये माता मृत्यू दर १0३ वर पोहोचला. अचानक मृत्यू दरात लक्षणिक वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा हादरली. तातडीने उपाययोजना करून २00९ मध्ये माता मृत्यू दर ५९ पर्यंत खाली आणण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेने यश मिळविले. २0१0 मध्ये माता मृत्यू दराचे प्रमाण दर हजारी ५३ झाले. २0११ मध्ये परत माता मृत्युचा दर अचानक वाढत माता मृत्यू दराने ८0 चा आकडा गाठला होता. तथापि, अर्भक मृत्यू दराचा आकडा कमी करण्यात २00७ पासून २0१३ पर्यंत यश आले नसल्याची शोकांतिका आहे. २00७ मध्ये अर्भक मृत्यूचा दर २४.९७ टक्के होता. २00८ मध्ये हाच दर ४८.११ वर झेपावला. अचानक मृत्युचा दर वाढल्याने आरोग्य यंत्रणा झोपेतून जागी झाली आणि २00९ मध्ये अर्भक मृत्यू दर ३७.३७ वर आणला. २0१0 मध्ये अर्भक मृत्यू दर स्थिरच राहिला. यावर्षी अर्भक मृत्यू दर ३७.७८ होता. २0११ मध्ये हा दर ३५.१३, २0१२ मध्ये ३६.२१ आणि २0१३ मध्ये २४.५५ असा अर्भक मृत्यू दराचा आकडा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (मृत्युंच्या कारणांची सर्वेक्षण योजना ग्रामीण अंतर्गत जीवनविषयक दर) दप्तरी नोंदविण्यात आला आहे. २00७ ते २0१३ या कालावधीतही अर्भक मृत्यूचा दर कमी झाला नसल्याने नवनवीन संशोधन, अत्याधुनिक सोयीसुविधा आणि कोट्यवधी रुपयांच्या तरतूद असलेल्या योजना वाशिम जिल्ह्यातून गेल्या कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. सात वर्षानंतरही अर्भक मृत्यू दर स्थिर असल्याच्या घटनेने जिल्हा आरोग्य विभागाच्या संबंधित यंत्रणेचे पितळ उघडे पाडले आहे.