लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील नव्याने घोषीत राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती व बांधकाम वेळेत व्हावे या उद्देशाने मे २०१७ मध्ये राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाशिम आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सुरू करून हे उपविभाग अकोला राष्ट्रीय महामार्गाशी संलग्न करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोलाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ८ मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांना पत्र पाठवून वाशिम उपविभागाच्या कामकाजासाठी इमारत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्या. तथापि, या प्रक्रि येला सहा महिने उलटले तरी, याची दखल घेण्यात आली नाही. हीच स्थिती यवतमाळ उपविभागाची आहे.राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला अंतर्गत अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, वाशिम या ५ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे येतात. सद्यस्थितीत सदर विभागाकडे केवळ तीन उपविभाग कार्यरत आहेत. त्यामुळे ५ जिल्ह्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक उपविभाग संलग्न करणे आवश्यक होते, ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ मे रोजी या संदर्भात निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभाग अकोला याांच्या कार्यक्षेत्रातील ५ जिल्ह्यांमधील राष्ट्रीय महामार्गाची कामे विहित वेळेत होऊन देखभाल दुरुस्तीची कार्ये सुलभ होण्यासाठी शासनावर कोणताही आर्थिक भर पडणार नाही या अटींच्या अधीन राहून कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प विभाग अमरावती यांच्या अधिपत्याखालील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र मांक ३ अमरावती अर्थात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग यवतमाळ आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ६ अर्थात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिम, तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ५ अर्थात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग अमरावती हे तीन उपविभाग नागपूर राष्ट्रीय महामार्ग मंडळांतर्गत येत असलेल्या अकोला राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे संलग्नीत करण्याचे निर्देश देण्यात आले. या संदर्भात अकोला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी २० सप्टेंबर २०१७ रोजी वाशिम जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयीन इमारतीमध्ये राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिमचा कारभार चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ७ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिमचा कारभार चालविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची एखाद सुस्थितीत असलेली इमारत उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली; परंतु याला महिनाभराचा कालावधी उलटला तरी, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्यापही राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिम कारभार अमरावती येथूनच चालविण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडचा बाधंकाम मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिम आणि यवतमाळचा कारभार संबंंधित जिल्ह्यांच्या मुख्यालयी चालविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या संदर्भात वारंवार पाठपुरावा करणारे वाशिम येथील संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राजूभाऊ कोंघे यांनी राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना निवेदन पाठवून यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी वाशिम राष्ट्रीय महामार्ग उपविभागासाठी जिल्हा मुख्यालयी रिकाम्या अवस्थेत असलेल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या काही जुन्या इमारती दुरुस्त करून वापरण्याचीही मागणी केली आहे. त्याची दखल घेण्यात आली नाही, तर बांधकाम मंत्र्यांना वाशिम येथे तालुका संभाजी ब्रिगेडच्यावतीने घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोट: राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिमसाठी आमच्याकडे उपलब्ध असलेली एक जुनी इमारत देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास आम्ही ती इमारत दुरुस्त करून राष्ट्रीय महामार्ग उपविभाग वाशिमच्या कामकाजासाठी उपलब्ध करून देऊ .- के. आर. गडेकर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम